भडगाव : दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, गिरणा नदीकाठ परिसर, भडगाव येथे जानेवारी २०२७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात दिंडोरी येथील आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी भडगाव, चाळीसगाव व पाचोरा तालुक्यांतील सेवेकऱ्यांना जागतिक कृषी महोत्सवाची माहिती देत मार्गदर्शन केले.
यावेळी विषमुक्त शेती, पर्यावरण संवर्धन, कर्करोगमुक्त जीवनशैली, प्लास्टिक बंदी, नैसर्गिक शेतीचे महत्त्व तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करणे, तसेच समाजात आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जागतिक कृषी महोत्सवाचा उद्देश आणि त्यामागील विचार परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सेवेकऱ्यांनी स्वीकारावी, असे आवाहन आबासाहेब मोरे यांनी केले. सेवेकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांमध्ये विषमुक्त शेती, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत शेतीविषयी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
भडगाव सेवा केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुष सेवेकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




